पुणे : राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना राज्यसरकारने विमान प्रवासाला परवानगी नाकारल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्याच्या इतिहासात इतके इगो असलेले पहिलेच सरकार असून हा सगळा पोरखेळ सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी पुण्यात केली आहे. तसेच या बाबीचा निषेधही त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, मी ऐकलेला हा सर्व प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ नेमणूक करतात. राज्यपालांना कुठे जायचं असेल तर आपल्या पद्धती प्रमाणे राज्यसरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र द्यावे लागते.त्या नुसार, प्रशासन पुढील आदेश काढते. या बाबत मी माहिती घेतली असून सामान्य प्रशासन विभागास तसे पत्र कालाच देण्यात आले आहे. त्यानंतर , सामान्य प्रशासन विभागाने फाईल तयार करून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली होती. असे असताना राज्यपाल पोहचल्यानंतर त्यांना विमानातून उतरविणे हे योग्य नाही. हे अत्यंत चुकीच असून कुठल्या पदाचा आपण अपमान करता आहोत ? राज्यपाल ही व्यक्ती नाही. व्यक्ती येते व्यक्ती जाते. राज्याच्या इतिहासात इतकं इगो असलेल सरकार या पूर्वी पाहिलं नाही. इतका प्रचंड इगो कशाचा आहे. मला वाटत हा पोरखेळ चाललेला आहे. हे निषेधार्थ असल्याचे फडणवीस म्हणाले