Pankaj Tripathi : अनेक अडचणींचा केला सामना, पत्नीची लाभली खंबीर साथ; ‘या’ भूमिकांमुळे मिळाली ओळख, पंकज त्रिपाठीचा संघर्षकाळ
Pankaj Tripathi : आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

Pankaj Tripathi : कोणत्याही कलाकाराला संघर्ष चुकलेला नाही. आज अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला असला, तरी त्यामागे मोठा संघर्ष दडलेला असतो. अभिनेता पंकज त्रिपाठी यांचाही प्रवास असाच आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला ‘मिर्झापूर द मुव्ही’ची चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेले पात्र म्हणजे पंकज त्रिपाठी यांनी साकारलेला कालीन भैय्या. ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती. त्यानंतर आता या कथेवर आधारित मिर्झापूर द मुव्ही चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
कालीन भैय्याच्या भूमिकेमुळे पंकज त्रिपाठी यांना मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र, या भूमिकेपूर्वीही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. ‘मसान’मधील रेल्वे तिकीट तपासनीसाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कोरलेली आहे.
शेतीकामापासून अभिनयाच्या स्वप्नापर्यंत (Pankaj Tripathi )
५ सप्टेंबर १९७६ रोजी पंकज त्रिपाठी यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी शिक्षणासोबत वडिलांना शेतीकामात हातभार लावला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. सणासुदीच्या काळात गावातील स्थानिक नाटकांमध्ये सहभागी होत ते आपली कला सादर करायचे. याच आवडीने त्यांना अभिनय क्षेत्राकडे आकर्षित केले.
गावात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंकज त्रिपाठी पाटणा येथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी हाजीपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले. पाटण्यात सात वर्षे राहिल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. २००४ मध्ये त्यांनी येथून पदवी प्राप्त केली.
मुंबईत संघर्षाची सुरुवात
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिगुरिडा कनासू’ या कन्नड चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर पुढील कामाच्या शोधात ते मुंबईत आले. २००४ ते २०१० या काळात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या; मात्र सुरुवातीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळाले नाही. कामाच्या शोधात मुंबईच्या रस्त्यांवर भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली. काम मिळेल याची शाश्वती नसतानाही त्यांनी अभिनयाची वाट सोडली नाही.
पंकज त्रिपाठी यांनी अनेक मुलाखतींमध्ये आपल्या संघर्षाच्या काळातील अनुभव सांगितले आहेत. या काळात त्यांची पत्नी मृदुला यांनी त्यांना मोठा आधार दिला. घरखर्चाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. पत्नीच्या पाठिंब्याशिवाय यश मिळवणे कठीण झाले असते, असे पंकज त्रिपाठी यांनी अनेकदा सांगितले आहे.
छोट्या भूमिकांपासून मोठ्या ओळखीपर्यंत
२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रन’ या चित्रपटातून पंकज त्रिपाठी यांनी अभिनयाला सुरुवात केली. मात्र, या भूमिकेची विशेष चर्चा झाली नाही. त्यानंतर काही काळ त्यांना कॅमेऱ्यासमोर काम करण्याची संधी मिळाली नाही.
सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘बंटी और बबली’, ‘अपहरण’, ‘ओमकारा’, ‘शौर्य’, ‘रावण’, ‘आक्रोश’, ‘चिल्लर पार्टी’ आणि ‘अग्निपथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. २०१२ मध्ये ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात त्यांनी सुलतानची भूमिका साकारली. या भूमिकेनंतर त्यांच्या अभिनयाची दखल घेतली जाऊ लागली.
मुख्य अभिनेता म्हणूनही उमटवला ठसा
पंकज त्रिपाठी यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट ‘गुडगाव’ (२०१७) होता. त्यानंतर ‘बरेली की बर्फी’ आणि ‘फुक्रे रिटर्न्स’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले. ‘न्यूटन’मध्ये त्यांनी राजकुमार राव यांच्यासोबत काम केले. ‘मिर्झापूर द मुव्ही’, ‘ओह माय डॉग’ आणि ‘मेट्रो… इन दिनों’ यांसारख्या चित्रपटांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आगामी काळातही पंकज त्रिपाठी अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग असणार आहेत.





