अमेरिकेत F-35 लढाऊ विमान कोसळले ; पायलटने पॅराशूटने उडी मारून वाचवला जीव

F-35 fighter jet crashes । अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील नेव्हल एअर स्टेशन लेमूरजवळ अमेरिकेचे एक फायटर जेट एफ-३५ कोसळले. जेट क्रॅश झाल्यानंतर लगेचच त्यात आग लागली आणि आकाशात धूर येऊ लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, “अमेरिकन नौदलाने एका प्रेस स्टेटमेंटद्वारे या घटनेची माहिती दिली आहे. हा अपघात का झाला याची माहिती अद्याप उपलब्ध नाही.” असे म्हटले आहे.
कॅलिफोर्नियातील लेमूरजवळ अमेरिकन नौदलाचा मास्टर स्ट्राइक फायटर बेस आहे. याठिकाणी एफ-३५ सी आणि एफ/ए-१८ई/एफ जेट देखील तैनात आहेत. बुधवारी संध्याकाळी या बेसजवळ फायटर जेट एफ-३५ कोसळले. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या लगेचच घटनास्थळी पोहोचल्या.
अमेरिकेच्या नौदलाने दुर्घटनेविषयी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,”एफ-३५ फायटर जेट स्ट्राइक फायटर स्क्वॉड्रन व्हीएफ-१२५ ला नियुक्त करण्यात आले होते. ज्याला ‘रफ रेडर्स’ असेही म्हणतात. व्हीएफ-१२५ हे फ्लीट रिप्लेसमेंट स्क्वॉड्रन आहे, जे पायलट आणि एअरक्रूंना प्रशिक्षण देते.
पायलटला रुग्णालयात दाखल F-35 fighter jet crashes ।
समोर आलेल्या माहितीनुसार, फायटर जेट क्रॅश होण्यापूर्वी पायलट बाहेर पडला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पायलटची प्रकृती स्थिर आहे, परंतु विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
यापूर्वीदेखील अमेरिकेत F-35 क्रॅश
या वर्षी २८ जानेवारी रोजी अलास्कामध्ये F-35A क्रॅश झाले. या अपघातातही पायलट सुखरूप बचावला. २८ मे २०२४ रोजी F-35B न्यू मेक्सिकोमध्ये क्रॅश झाला. यापूर्वी १७ सप्टेंबर २०२३ रोजी F-35B देखील क्रॅश झाला. या अपघातानंतर, विमानाचा अवशेष १८ सप्टेंबर रोजी सापडला असला तरी सुमारे ३० तासांपर्यंत विमान सापडले नाही.





