रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘आय ट्रॅकर’ चाचणी

राष्ट्रीय महामार्गांवर सातत्याने होत असलेल्या दुर्घटनांनंतर पर्यायांचा शोध
पुणे – देशातील रस्ते अपघात संख्या कमी करण्यासाठी “आय ट्रॅकर’ चाचणीचा नवा पर्याय लागू करण्याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली आहे. हा नियम लागू झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने चालवण्यासाठी “आय ट्रॅकर’ चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक केले जाऊ शकते. यासाठी चालकास दरवर्षी परीक्षा द्यावी लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नवीन प्रस्तावाबाबत नुकतीच माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते अपघातांची कारणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याबाबत काही उपाययोजना करण्याबाबतचा अभ्यास अहवाल मंत्रालयाला नुकताच सादर करण्यात आला आहे. महामार्गांवर होणाऱ्या अपघातांपैकी सुमारे 65 टक्के अपघात सरळ रस्त्यांवर होतात. त्याची कारणे तपासली असता “लक्ष विचलित होणे’ हे सर्वांत महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले.
दरम्यान, “दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या किंवा वार्षिक एक लाख किलोमीटर किंवा त्याहून अधिक वाहन चालवणाऱ्या चालकांची एकाग्रता पातळी कमी अनुभव असलेल्या चालकांपेक्षा चांगली आहे,’ असे एका अभ्यासानुसार सांगण्यात येते. त्यानुसार चालकांची एकाग्रता तपासण्यासाठी ही चाचणी करणे बंधनकारक होऊ शकते.
ही चाचणी अशी केली जाते
प्रथम ड्रायव्हरच्या डोळ्यांची हालचाल “सिम्युलेटर’वर तपासली जाईल. यात होर्डिंग्ज, बांधकाम, मोबाइल संभाषणे आणि मेसेज आदी लक्ष विचलित करणारे घटक समाविष्ट केले जातील. नंतर ड्रायव्हिंग करताना डोळ्यांच्या हालचालींची वास्तविक स्थिती रेकॉर्ड केली जाईल. यावरून ड्रायव्हरच्या डोळ्यांचे लक्ष विचलित होण्याची टक्केवारी कळेल, अशीच चाचणी देशभर लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
‘आय ट्रॅकिंग’ म्हणजे नेमके काय?
“आय ट्रॅकिंग’ म्हणजे डोळ्यांचे वर्तन जाणून घेणे. यात प्रामुख्याने बाहुल्यांचा विस्तार, पाहण्याचा आणि लुकलुकण्याचा वेग? दृष्टीची स्थिरता, डोळे किती दूर पाहू शकतात? तुम्ही कुठेतरी पहात आहात आणि तुमचे लक्ष दुसरीकडे आहे का? डोळे दिवसा आणि रात्री सारखेच काम करतात की नाही हे जाणून घेणे याला “आय ट्रॅकिंग’ म्हणतात. ज्या यंत्राद्वारे डोळ्यांची तपासणी केली जाते त्याला आय ट्रॅकिंग सिस्टीम म्हणतात.





