लक्षवेधी : स्वराज्याची गर्जना
पारतंत्र्यात असलेल्या आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी ‘स्वराज्याची गर्जना’ करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा...

– भूपेंद्र रतिलाल दोशी
Lokmanya Tilak : पारतंत्र्यात असलेल्या आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी ‘स्वराज्याची गर्जना’ करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा…
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!’ अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) यांचा जन्म महाराष्ट्रातील दापोली तालुक्यामधील चिखलगाव येथे 23 जुलै 1856 रोजी झाला होता. पुण्यात त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले होते. त्यांना वाचन फार प्रिय होते. गणित विषयावर तर त्यांना विशेष प्रेम होते. विद्यार्थी काळात त्यांचा गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर विशेष स्नेह जडला होता.
चिपळूणकर नवीन शाळा सुरू करणार आहेत, हे कळल्यावर तत्परतेने त्यांना भेटायला गेले. 1 जानेवारी, 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची सुरुवात झाली. टिळक मेघदूत व नीतिशतक शिकवत होते. चिपळूणकरांच्या निधनानंतर संस्थेला अधिक नियमबद्ध व स्थायिक स्वरूप देण्याच्या हेतूने डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात आली.
त्यानंतर दोन महिन्यांतच फर्ग्यसन कॉलेजने मूर्त स्वरूप धारण केले. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासाठी व संस्थेबाहेरील लाखो देशबांधवांना सुशिक्षित करणे आवश्यक असल्याने त्यांच्यासाठी ‘केसरी’ व ‘मराठा’ अनुक्रमे मराठी व इंग्रजी नियतकालिके सुरू करण्यात आली. ही वर्तमानपत्रे दैनंदिन प्रश्न व लोकस्थितीवर निबंध, नवीन ग्रंथावर टीका तसेच विलायतच्या राज्य प्रकरणाच्या वाटाघाटींचा सारांश घेण्यात येईल, असे संपादकांनी जाहीर केले होते.
‘केसरी’ हे लोकशिक्षणाच्या हेतूने राजकारण, समाजकारण व अर्थकारण अशा विविध विषयांवर निःपक्षपाती तसेच काळसंगत लेख वाचकांसमोर ठेवले गेले. लोकांत निष्काम लोकसेवा, स्वावलंबन अशा विविध गुणांना फुलविण्यासाठी त्यांनी स्वतःची लेखणी अक्षरशः झिजवली.
जनसामान्यांत ऐक्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी जी अनेक साधने असतात, त्यातील एक उपास्यदैवत असणे आवश्यक आहे. एक धर्म, एक राजा, एक भाषा हे राष्ट्रीयत्वाचे मुख्य अंग आहे. परिणामी, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तसेच, शिवजयंती उत्सवाला प्राधान्य दिले होते. ज्या शूरवीर पुरुषांनी देशाचे नाव अजरामर केले, त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना होती.
त्यापेक्षा महत्त्वाचा हेतू राष्ट्राच्या महापुरुषांचं स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यासाठीचे उत्तम साधन आहे. 1895 या वर्षी टिळकांनी शिव समाधीच्या जीर्णोद्धारासाठी चळवळ सुरू करून शिवजयंतीला राष्ट्रीय उत्सावाचे स्वरूप दिले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातींच्या लोकांना एका ठिकाणी बसण्याचे स्थान हे शिव छत्रपतींचे चरित्रच आहे, असा विचार त्यांनी ‘केसरी’च्या माध्यमातून व्यक्त केला.
टिळकांच्या नेतृत्वाला आवाहन देणारी बाब म्हणजे प्लेग व दुष्काळाचे संकट. ‘सार्वजनिक सभा’मार्फत दुष्काळाची माहिती गोळा करून सरकारकडे प्रस्तुत करणे, दुष्काळग्रस्त लोकांना मदत करणे, त्यांना काम देणे ही जबाबदारी टिळकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. लोकांना त्यांचे हक्क समजण्यासाठी ‘फेमिन रिलिफ कोड’चे मराठीत भाषांतर केले.
प्लेग निवारणार्थ सरकारने नेमलेलेल्या समितीचे अध्यक्ष रँड नावाचे अधिकारी होते. टिळकांनी रँडशाहीचे बीभत्स स्वरूप ‘केसरी’च्या माध्यमातून लोकांना दाखविले. रँडशाहीच्या जुलूमशाहीमुळे रँडचा खून झाला. रँडच्या खुनाशी टिळकांचा संबंध जोडण्याकरिता इंग्रज सरकारने आकाश-पाताळ एक केले, परंतु सरकारला त्यात यश आले नाही.
सरतेशेवटी इंग्रजांनी टिळकांवर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून टिळकांना दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. 1905 ते 1908 हा कालखंड भारताचा इतिहासामध्ये महत्त्वाचा आहे. टिळकांची (Lokmanya Tilak) कीर्ती प्रांतीय सीमा ओलांडून सबंध भारत देशाच्या कानाकोपर्यात पसरली. स्वदेशी बहिष्काराची चळवळ देशव्यापी झाली. या संदर्भात टिळकांचे कार्य आकाशाऐवढे मोठे आहे. दीर्घकालीन दास्यत्वामुळे लोकांचे नीती-धैर्य संपले होते. अशा काळात नीती-धैर्य वाढविण्यात टिळकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
टिळकांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाची बाब म्हणजे ‘होमरूल चळवळ’. आयर्लंडच्या पद्धतीप्रमाणे होमरूल चळवळ सुरू करण्याची घोषणा टिळकांनी 1 मे 1916 रोजी बेळगाव प्रांतिक परिषदेमध्ये केली. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चतुःसूत्री कार्यक्रम टिळकांनी तयार केला होता. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चार साधनांचा पुरस्कार टिळक करीत होते.
जनसामान्य लोकांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य, संघटन यांसारखे गुण विकसित व्हावे, यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिव जयंती उत्सवची सुरुवात केली होती. लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) बाबतीत खूप काही लिहिता येईल; परंतु जागेअभावी लेखणीस विराम देत आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे या महान व्यक्तीने शेवटचा श्वास घेतला. सबंध देश शोकसागरात बुडाला.






