Eye Care: हिवाळ्यात थंडी वाढतेच, पण त्याचबरोबर प्रदूषणाचाही त्रास वाढतो. याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. डोळ्यांत जळजळ, पाणी येणं, पापण्या चिकटणं अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. त्यामुळे या काळात डोळ्यांची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. डोळ्यांच्या निगेसाठी आयुष मंत्रालयाने चार सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत. हे उपाय रोजच्या दिनचर्येत सहज करता येतात. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी 4 सोपे आयुर्वेदिक उपाय 1) आय पामिंग डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी आय पामिंग हा अतिशय सोपा उपाय आहे. दोन्ही हातांच्या तळव्यांना एकमेकांवर घासून गरम करा आणि मग डोळ्यांवर हलकेच ठेवा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि मनालाही शांत वाटतं. सतत मोबाईल, लॅपटॉप पाहणाऱ्यांसाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे. 2) त्राटक त्राटक हा डोळ्यांच्या आरोग्यासाठी प्रसिद्ध व्यायाम आहे. एका ठिकाणी मेणबत्ती लावा आणि तिच्या ज्योतीकडे काही वेळ पापणी न लवता पाहा. यामुळे डोळ्यांची एकाग्रता वाढते, डोळे स्वच्छ राहतात आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते. 3) ओले कापसाचे पॅड डोळ्यांना आराम देण्यासाठी ओल्या कापसाच्या बोळ्यांचा वापर करा. कापूस थंड पाण्यात किंवा गुलाबजलात भिजवून काही मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांचा ताण, डोकेदुखी कमी होते आणि डोळ्यांखालची सूजही उतरते. काही जण यासाठी काकडीचे तुकडेही वापरतात. 4) वाफ घेणे हिवाळ्यात अनेकदा सकाळी उठल्यावर डोळे चिकटलेले असतात. अशा वेळी हलकी वाफ घेतल्याने डोळे स्वच्छ होतात आणि पापण्या चिकटत नाहीत. मात्र जास्त वाफ घेऊ नका, कारण त्यामुळे डोळे कोरडे होऊ शकतात. दररोज हे चार उपाय केल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो जळजळ आणि कोरडेपणा कमी होतो डोळ्यांची नैसर्गिक दृष्टी टिकून राहण्यास मदत होते