कमालीच्या दारिद्य्रामुळे म्यानमारचे नागरीक मोठ्या हाल अपेष्टेत

संयुक्तराष्ट्रे – म्यानमार मध्ये सध्या दारिद्रयाचे प्रमाण खूप वाढले असून गेल्या 20 वर्षात नव्हती अशी अभुतपुर्व स्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील नागरीक मोठ्या हालअपेष्टेत राहात आहेत अशी माहिती संयुक्तराष्ट्रांच्या मानवतावादी कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
म्यानमार मध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यापासून तेथील आर्थिक स्थिती दोलामयमान झाली असून देशाची निम्मी जनता हालाकिच्या स्थितीत जगत आहे असे संयुक्तराष्ट्रांचे अधिकारी अँड्रयु किर्कवुड यांनी म्हटले आहे. किर्कवुड यांनी म्हटले आहे की, त्या देशात जातीय स्वरूपाचा तणावही सातत्याने दिसून येत आहेत त्याचाही विपरित परिणाम समाज जीवनावर झाला आहे. करोनाच्या लाटांनीही येथील समाज जीवनावर विपरित परिणाम केला आहे.
त्यातून देश सावरणे तेथील लष्करी प्रशासनाच्या आवाक्याच्या बाहेर गेले असल्याचेही स्पष्ट दिसून आले आहे. गेल्या 1 फेब्रुवारी रोजी लष्कराने तेथील लोकशाहीवादी नेत्या आँगसॅन सु क्यी यांच्या हातून सत्ता हिरावऊन घेतली आहे.
त्यावेळी लष्कराच्या विरोधात नागरीकांची उग्र निदर्शने झाली होती पण ही निदर्शने लष्कराने निर्दयापणे मोडून काढली. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात 1100 पेक्षा अधिक नागरीक ठार झाले होते.

