Pune | वडगाव शेरीत खंडणीखोराला अटक

पुणे, – खाद्यपदार्थ विक्रेत्याकडून खंडणी उकळणाऱ्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. वडगाव शेरी भागात ही घटना घडली. याप्रकरणी जीवन बनसोडे (रा. खराडी) याला अटक करण्यात आली.
याबाबत आकाश राजू कोरे (वय २४, रा. मोजेसवाडी, वडगाव शेरी ) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इनऑर्बिट माॅलजवळ कोरे यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा स्टाॅल आहे. “या भागात व्यवसाय करण्यासाठी दररोज १०० रुपये हप्ता द्यावा लागेल,’ असे आरोपी बनसोडेने कोरे यांना सांगितले. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. वर्षभरात बनसोडेने कोरे यांच्याकडून २५ हजार २०० रुपये घेतले. त्यानंतर बनसोडे काही दिवसांपूर्वी कोरे यांच्या दुकानाजवळ आला.
दररोज २०० रुपये हप्त्याची मागणी केली. हप्ता न दिल्यास त्याने पुन्हा धमकी दिली. बनसाेडेच्या त्रासामुळे घाबरलेल्या कोरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. बनसोडेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने तपास करत आहेत.





