Crime News : कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची धमकी देत खंडणी?
Crime News : जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होऊन सुमारे नऊ महिने झाले असताना नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींविरोधात खंडणीसारख्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांवरून गुन्हा दाखल झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

जुन्नर : कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची धमकी देत व्यवस्थापकाकडून चार लाख रुपये रोख घेतल्याच्या आरोपावरून जुन्नर पोलीस ठाण्यात दोन नगरसेवकांसह दोन नगरसेविकांच्या पतींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जुन्नरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू झाली आहे.
या प्रकरणी मुंबई येथील व्यवस्थापक मुकुंद रत्नाकर डोंगरे (वय 52) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार प्रशांत सराईकर, वाजीद इनामदार, गणेश पातुरकर आणि सोहेल शेख यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 308(2), 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 287/2026 दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नंदनवन सोसायटी, रायगड सी, तिसरा मजला, कल्याणपेठ, जुन्नर येथील सदनिकेत हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची धमकी देत व्यवस्थापकाकडून चार लाख रुपये घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होऊन सुमारे नऊ महिने झाले असताना नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींविरोधात खंडणीसारख्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांवरून गुन्हा दाखल झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. नगरसेवकांकडून नागरिकांच्या प्रश्नांसाठी कामाची अपेक्षा असताना अशा प्रकारचे आरोप समोर येत असल्याने, आपण नगरसेवकांना यासाठी निवडून दिले होते का?, असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपांची सत्यता तपासादरम्यान स्पष्ट होणार आहे.
आणखी चार नगरसेवकांचा सहभाग?
या प्रकरणात आणखी चार नगरसेवकांचा सहभाग आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे जुन्नरकरांचे लक्ष लागले आहे.





