सीमाभागांत तोफगोळे निकामी करण्याची व्यापक मोहीम; लष्करी जवान आणि पोलीस सहभागी

राजौरी – संघर्षविरामानंतर जम्मू-काश्मीरच्या सीमाभागांत स्फोट न झालेले तोफगोळे निकामी करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये लष्करी जवान आणि पोलीस सहभागी झाले आहेत.
भारतासमवेतच्या संघर्षावेळी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील निवासी भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत असणाऱ्या गावांमध्ये मारा केला. त्या माऱ्यावेळी गोळीबार करण्याबरोबरच तोफगोळे डागण्यात आले.
तशा प्रकारच्या माऱ्यात काही तोफगोळे स्फोट न होता तसेच पडून राहतात. त्यामुळे लष्करी जवान आणि पोलिसांनी राजौरी, पूॅंच, जम्मू, सांबा आदी भागांत तोफगोळे निकामी करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये बॉम्बनाशक पथके सहभागी झाली आहेत.
संघर्षावेळी सीमाभागांतील २ लाखांहून अधिक ग्रामस्थांनी त्यांची घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. त्यातील अनेक जण संघर्षविरामानंतर आपापल्या घरी परतले आहेत.
मात्र, अजूनही काही जण इतरत्र आश्रय घेऊन आहेत. सुरक्षा यंत्रणांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांना घरी परतण्याची मुभा दिली जाईल. पाकिस्तानी माऱ्यात अनेक घरांचे नुकसान झाले. संबंधित कुटूंबांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.





