पुणे (प्रतिनिधी) – ‘पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शैक्षणिक अर्थसहाय्य तसेच विविध कल्याणकारी योजनांना पालकांच्या मागणीवरून सर्व योजनांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याकरिता २७ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापौर मोहोळ म्हणाले की, ‘समाज विकास विभागामार्फत भारतरत्न डॉ. अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना (इ. १०वी), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना (इ. १२ वी) तसेच महिला व बाल कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना,’
‘युवक कल्याणकारी योजना या योजनेअंतर्गत विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविणेकरिता अर्ज भरण्याची शेवटची मुदत पूर्वी दि. २९ जानेवारी २०२१ होती, परंतू विविध अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले नाहीत, त्यामुळे पालकांच्या मागणीनुसार ऑनलाईन अर्ज भरण्यास एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.’