Nagar : सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ – आ.हेमंत ओगले

श्रीरामपूर : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार ओगले यांनी शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांना स्पर्श करत त्यामध्ये दूध दरवाढ, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा तसेच सोयाबीन व इतर पिकांच्या हमीभावात बाबत देखील सरकारचे लक्ष वेधले होते. अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. त्याला यश आले असून शासनाने सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यापूर्वी ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. जे शेतकरी 6 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची नोंद करतील, अशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी 4,892 रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सुरू आहे.
वाढलेल्या मुदतीची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीच्या ऑनलाइन नोंदी बाकी असतील, अशा शेतकऱ्यांनी त्वरित सहा जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार ओगले यांनी केले आहे.





