Satara | शेतकर्यांच्या सोईसाठी ईपीक पाहणीची मुदत वाढवा

कोरेगाव, (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्यावतीने ई पीक पाहणी ऍपद्वारे शेतकर्यांना पीक पाहणीची माहिती अद्ययावत माहिती भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे, प्रत्यक्षात मात्र हे ऍप अकार्यक्षम असून, पूर्ण क्षमतेने चालत नाही,
त्यामुळे शेतकर्यांना त्यावर माहिती भरता येणे अशक्य होत आहे. राज्य सरकारने शेतकरी हितासाठी ई पीक पाहणी ऍपद्वारे शेतकर्यांना पीक पाहणीची माहिती अद्ययावत माहिती भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडसह समविचारी संघटनांनी केली आहे.
शुक्रवारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव आनंदराव बर्गे यांच्यासह तालुकाध्यक्ष विक्रम फडतरे, लहू सावंत, अनिल बाबर, जितेंद्र जगदाळे, मारुती जगदाळे, गौरव बर्गे, विराज बर्गे, सुर्यकांत चव्हाण, विशाल चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी,
मंथन क्षीरसागर, शहनवाझ कुरेशी, योगेश बर्गे, शौकत कुरेशी यांच्यासह शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेचे पदाधिकारी व शेतकर्यांनी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन सादर केले.
आनंदराव बर्गे यांनी शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. ई पीक पाहणी ऍप अकार्यक्षम असून, पूर्ण क्षमतेने चालत नाही, त्यामुळे शेतकर्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश ठिकाणी पीक पाहणीच्या नावाखाली अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.
तहसीलदार डॉ. कोडे यांनी शेतकर्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका प्रशासन घेईल, ऍपबद्दल राज्य सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचवेल, अशी ग्वाही दिली.





