Pune : “एक्स्प्रेस-वे’ पडतोय अपुरा!

पुणे : पुणे ते मुंबईचा प्रवास आणखी गतिमान तसेच अंतर कमी करण्यासाठी “मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने कामकाज सुरू आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाचे विस्तारीकरणाचा प्रकल्प घेतला असून, त्यानुसार द्रुतगती मार्ग सहाऐवजी आठ पदरी करण्यात येणार आहे.
यासाठीचा प्रस्ताव “एमएसआरडीसी’ने राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला असून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती मार्गाची क्षमता वाढणार असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून दिवसेंदिवस वाहन संख्या वाढत आहे. द्रुतगती मार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने धावतात. या मार्गावर वाहनांची वाढती वर्दळ आणि आता अपुरा पडणारा रस्ता यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव “एमएसआरडीसी’ने तयार केला आहे.
त्याला मान्यता मिळाल्यानंतर तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्ग सलग आठ पदरी होऊन विनाअडथळा वेगवान प्रवास होणार आहे.
“मिसिंग लिंक’चे काम गतीने
महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटच्या पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. याप्र्कल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे असून या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, आशिया खंडातील सर्वांत मोठा उभारण्यात येणारा दरी पुलाचे कामही वेगाने सुरू आहे.
असा आहे प्रस्ताव
– सध्याचा मार्ग पुणे आणि मुंबईच्या दिशेने प्रत्येकी तीन पदरी
– दोन्ही बाजूंना आणखी एक-एक लेन करण्यात येणार
– खालापूर टोल नाका ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता
– उर्से टोलनाक्यापासून पुढे द्रुतगती मार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय
आकडे बोलतात…
७० कि.मी.
प्रस्तावित लेनची लांबी
——–
100 हेक्टर जागा
नव्या मार्गिकांसाठी आवश्यक
——–
१,५०,०००
रोजची सरासरी वाहनसंख्या
——–




