लखनौ – उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये मंगळवारी दुपारी सामथर शहरातील पहारपुरा तिराहा जवळील शेतात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली होती. या अपघातात सात महिला आणि एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. येथील चार महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील रहिवासी असलेला बन्ने खान हा सरकारी जमिनीवर छुप्या पद्धतीने फटाके बनवत होता. कारखान्यात उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले की, दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फटाक्यांमध्ये बारूद भरत असताना अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला. परिसरातील नागरिकांनी सांगितले, स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. अपघाताची माहिती मिळताच सीओ हरिमोहन सिंग, पोलीस स्टेशन प्रभारी अजमेर सिंह भदौरिया आणि इतर पोलीस अधिकारी तेथे पोहोचले. एसपी (आरए) गोपीनाथ सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.