सुलेमानीच्या स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात स्फोट ! किमान १०३ ठार, १४१ जखमी

नवी दिल्ली – इराणच्या लष्कराचे जनरल सुलेमानींच्या हत्येच्या स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठा स्फोट झाला असून त्यात किमान १०३ जण ठार झाले आणि १४१ जण जखमी झाले आहेत. गाझा पट्टीत हमास विरुद्ध इस्रायलच्या सुरू असलेल्या युद्धावर मध्यपूर्वेत व्यापक तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभुमीवर या स्फोटामागे नक्की कोण असू शकते हे स्पष्ट झाले नाही. मात्र हा स्फोट म्हणजे दहशतवादी या स्फोटानंतर झालेल्या धावपळीदरम्यान काही लोक जखमी झाले, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राजधानी तेहरानपासून सुमारे ८२० किलोमीटर आग्नेयेस असलेल्या केरमनमध्ये झालेल्या स्फोटानंतर लगेचच कोणत्याही संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
या हल्ल्यामागे असू शकतात असे इराणचे अनेक शत्रू आहेत, यात निर्वासित गट, दहशतवादी संघटना आणि सरकारी गट यांचा समावेश आहे. इराणने हमास तसेच लेबनीज शिया मिलिशिया हिजबुल्लाह आणि येमेनच्या हौथी बंडखोरांना पाठिंबा दिला आहे.
अमेरिकेने मारले होते कासेम सुलेमानीला
इराणचा दिवंगत जनरल कासेम सुलेमानीच्या हत्येच्या चौथ्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेने जानेवारी २०२० मध्ये इराकच्या विमानतळावर ड्रोन हल्ला घडवून जनरल कासेम सुलेमानीला ठार केले होते. इराणच्या लष्करी उपक्रमांचा प्रणेता म्हणून कासेम सुलेमानीकडे बघितले जाते. त्याला देशाचे आदर्श प्रतिक मानले जात असायचे. मात्र त्याने इराक युद्धाच्यावेळी दहशतवादी गटाची स्थापना केली होती. अमेरिकेच्या सैन्याला लक्ष्य करण्यासाठी त्याने भूसुरुंग वापरायला सुरुवात केली होती, असे अमेरिकेने म्हटले आहे. २०२० मध्ये त्याच्या दफनविधीच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीदरम्यान ५८ जण ठार झाले होते.



