रोम – रोमच्या अग्नेयेकडील एका गॅस स्टेशनमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये किमान २५ जण जखमी झाले आहेत. यामध्ये ९ पोलीस अधिकाऱ्यांचा आणि अग्निशामक दलाच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. सकाळी ८ वाजल्यानंतर रोममध्ये स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. काळ्या धुराचे आणि आगीचे मोठे लोट शहराच्या अनेक भागातून दिसत होते. या स्फोटात १६ रहिवासी जखमी झाले. त्यातील दोन जण गंभीर स्थितीत होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी नऊ जण कायदा अंमलबजावणी दलाचे पोलिस आणि कॅराबिनिएरीचे आहेत आणि एक अग्निशमन दलाचा कर्मचारी आहे, असे रोमचे महापौर रॉबर्टो ग्वाल्टिएरी म्हणाले. या स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू केला गेला असून गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पहिल्या स्फोटानंतर पोलिसांनी पेट्रोल पंपाजवळील एक क्रीडा केंद्र तातडीने रिकामे केले आणि अनेक मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवले.