Headache: जास्त वेळ झोपल्यानंतरही डोकेदुखी होतेय? ‘ही’ 6 कारणं असू शकतात जबाबदार; जाणून घ्या बचावाचे उपाय
Headache जास्त वेळ झोपणे हे एकमेव कारण असेलच असे नाही. झोपेच्या वेळेत झालेला बदल, पाणी कमी पिणे, बराच वेळ काही न खाणे, झोपेची गुणवत्ता आणि झोपण्याची चुकीची स्थिती यांसारख्या कारणांमुळेही सकाळी डोकेदुखी होऊ शकते.

Headache: झोप ही शरीर आणि मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुरेशी आणि चांगल्या गुणवत्तेची झोप घेतल्याने शरीराला आराम मिळतो. मात्र काही लोकांना नेहमीपेक्षा जास्त वेळ झोपल्यानंतर उठल्यावर डोकेदुखी, डोक्यात जडपणा किंवा थकवा जाणवतो. त्यामुळे ‘जास्त झोपूनही डोके का दुखते?’ असा प्रश्न अनेकांना पडतो.
जास्त वेळ झोपणे हे एकमेव कारण असेलच असे नाही. झोपेच्या वेळेत झालेला बदल, पाणी कमी पिणे, बराच वेळ काही न खाणे, झोपेची गुणवत्ता आणि झोपण्याची चुकीची स्थिती यांसारख्या कारणांमुळेही सकाळी डोकेदुखी होऊ शकते.
1. झोपेच्या वेळेत अचानक बदल
आपल्या शरीराचे एक नियमित झोप-जागण्याचे चक्र असते. दररोज ठरावीक वेळेला झोपण्याची आणि उठण्याची सवय असल्यास शरीर त्यानुसार जुळवून घेत असते. मात्र सुट्टीच्या दिवशी नेहमीपेक्षा खूप उशिरापर्यंत झोपणे किंवा झोपेची वेळ अचानक बदलणे काही लोकांमध्ये डोकेदुखी किंवा सुस्तीचे कारण ठरू शकते.
2. शरीरात पाण्याची कमतरता
झोपलेल्या काळात आपण अनेक तास पाणी पीत नाही. त्यामुळे सकाळी शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. नेहमीपेक्षा जास्त वेळ झोपल्यास पाणी न पिण्याचा कालावधी आणखी वाढतो. त्यामुळे काही लोकांना उठल्यानंतर डोकेदुखी जाणवू शकते.
3. बराच वेळ काही न खाणे
जास्त वेळ झोपल्यामुळे नाश्त्याची वेळ पुढे ढकलली जाते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर बराच वेळ काही खाल्ले जात नाही. काही लोकांना अशा परिस्थितीत अशक्तपणा, चक्कर किंवा डोकेदुखीसारखी लक्षणे जाणवू शकतात.

Wake Up With a Headache
4. झोपेची गुणवत्ता महत्त्वाची
फक्त किती तास झोपलो हे महत्त्वाचे नसून झोप किती चांगली झाली, हेही महत्त्वाचे आहे. रात्री वारंवार झोपमोड होत असेल किंवा झोपल्यानंतरही शरीराला पुरेसा आराम मिळत नसेल, तर सकाळी उठल्यावर थकवा आणि डोकेदुखी जाणवू शकते.
5. मायग्रेनचा त्रास
काही लोकांमध्ये झोपेच्या वेळेत किंवा झोपेच्या पद्धतीत झालेला बदल मायग्रेनचा त्रास वाढवू शकतो. डोकेदुखीसोबत प्रकाश किंवा आवाज सहन न होणे, मळमळ किंवा ठणकणारी वेदना जाणवत असल्यास मायग्रेनची शक्यता असू शकते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
6. झोपण्याची चुकीची स्थिती
बराच वेळ एकाच स्थितीत झोपल्यामुळे मान आणि खांद्याच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. चुकीच्या उशीमुळे किंवा झोपण्याच्या स्थितीमुळे मान आखडणे आणि त्यासोबत डोकेदुखी होऊ शकते.
किती तास झोपणे योग्य?
झोपेची गरज प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार आणि परिस्थितीनुसार वेगळी असते. सर्वसाधारणपणे निरोगी प्रौढांसाठी दररोज सुमारे 7 ते 9 तासांची नियमित झोप पुरेशी मानली जाते. मात्र फक्त झोपेचे तास मोजण्यापेक्षा झोपेची गुणवत्ता आणि नियमितता याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
डोकेदुखी टाळण्यासाठी काय कराल?
दररोज शक्यतो ठरावीक वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. दिवसभर पुरेसे पाणी प्या. सकाळचा नाश्ता किंवा जेवण विनाकारण खूप उशिरा करू नका. झोपताना मानेला योग्य आधार मिळेल याची काळजी घ्या आणि रात्री पुरेशी गुणवत्तापूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा.
जर जास्त झोपल्यानंतर होणारी डोकेदुखी वारंवार होत असेल, तीव्र होत असेल किंवा त्यासोबत इतर त्रास जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.





