पॅरासिटामॉलसह 800 अत्यावश्यक औषधे महागली

मोठ्या आजारांवरील औषधांची दि.1 एप्रिलपासून सरासरी 10% भाववाढ
पुणे – सर्वसामान्य ताप आल्यास त्यावर वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलसह 800 प्रकारच्या औषधांच्या दरात वाढ होणार असून, दि. 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. असे असले, तरी या वाढीवर केमिस्ट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे.
“नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटी’ने (एनजीजीए) ही दरवाढ केली आहे. तसे पत्रकही त्यांनी शुक्रवारी जारी केले आहे. 10.7 टक्क्यांची वाढ यावेळी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आणखी वाढणार आहे. होलसेल प्राइज इंडेक्सने दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास आणि विचार करूनही ही वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. या निर्णयानुसार आता साध्या तापासह अनेक महत्त्वाच्या ठरणाऱ्या मोठ्या आजारांवरील औषधेही महागणार आहेत.
दरम्यान, औषध किंमत वाढीचा अध्यादेश अद्याप रिटेलर किंवा होलसेल डिस्ट्रिब्युटरकडे आला नाही. तो आल्यावर त्यामध्ये औषधाच्या किंमती का वाढवल्या याचे कारण दिलेले असते. कच्चा माल बाहेरच्या देशातून घेतो. तो आणताना कस्टमपासून सर्व आयातशुल्क वाढले आहे. औषधांच्या किंमती स्थिर राहिल्या पाहिजेत, किंवा वाढण्यापेक्षा कमी झाल्या तरी चालणार आहेत.
याचे कारण म्हणजे या औषधांच्या किंमती वाढल्या तर लोक जेनेरिक औषधांकडे मोठ्याप्रमाणात वळतील. सध्या हे प्रमाण 20 टक्के आहे. हृदयरोग, न्यूमोनिया किडनीविकार असणाऱ्यांसाठी स्टॅंडर्ड कंपनीच्याच गोळ्या लागतात. जर, हीच औषधे महागली, तर तसे आजार असलेल्या नागरिकांनी करायचे काय?, असा सवाल औषध विक्रेते कौस्तुभ धबडगे यांनी विचारला आहे.
औषधांचे दर सर्वसामान्यांना परवडले पाहिजे. मुळात नवे परिपत्रक अद्याप मिळाले नाही, त्यामुळे कोणत्या प्रकारची औषधे वाढली आहेत हे अजूनही समजले नाही. कच्चा माल कमी पडल्याने औषधे निर्माण करता आली नाहीत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी आता भारताने कच्चामाल निर्मितीत सक्षम झाले पाहिजे. यामुळे परवडणाऱ्या दरात औषधे मिळतील.
– अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट





