मोदी सरकारच्या भरमसाठ खर्चामुळे आगामी काळात महागाई वाढणार – माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात अनुदान असणाऱ्या लोक उपयोगी योजनांवर भरमसाठ खर्च केला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये भारताची वित्तीय आणि चालू खात्यावरील तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे असा इशारा माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे.
एकीकडे केंद्र सरकारचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्याकडूनही अशाच प्रकारे खर्च केला जात आहे. मात्र त्यावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही. करोनाच्या काळात आणि नंतरही केंद्र सरकारने अनुदान असलेल्या बऱ्याच योजना सुरू केलेल्या आहेत.
त्यामुळे भारताची तूट 6.8 टक्क्यावर गेली आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या सरकारची आर्थिक धोरणे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी तयार करण्यात आली आहेत.
एकीकडे अनुदान दिल्या जाणाऱ्या योजना सुरू केल्या जात असतानाच मोठ्या कंपन्यांना करात सूट देण्यात आली आहे. खर्च वाढत असताना महसूल कमी होत असल्यामुळे भारताला आगामी काळामध्ये महागाईचा सामना करावा लागेल. त्याचबरोबर विकासदर कमी होईल, असा दावा त्यांनी केला.





