Satara : पुसेगावला खिलार जनावरांचे प्रदर्शन

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये गुरुवारी जनावरांची नोंद झाली असून, शुक्रवारी (दि. 3) बक्षीसपात्र जनावरांची निवड केली जाणार आहे. राज्यातील खिलारप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव केले आहे.
खिलार जनावरांच्या उपजातींनुसार खिलार काजळी बैल, खिलार काजळी गाय, खिलार कोसा बैल, खिलार कोसा गाय या चार मुख्य गटांमध्ये ही निवड स्पर्धा होईल. प्रत्येक गटात जुळीक, सहा दाती, चार दाती, दोन दाती, आदत (एक वर्षावरील), आदत (एक वर्षाखालील) असे सहा उपगट तयार केले आहेत. प्रत्येक उपगटात निवड झालेल्या प्रथम चार विजेत्या जनावरांच्या मालकांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये, अशी बक्षिसे देण्यात येतील. चारही मुख्य गटांमधील चॅम्पियन जनावराच्या मालकाला 25 हजार रुपये आणि श्री सेवागिरी करंडक देण्यात येईल.
महाराष्ट्र व कर्नाटकच्या कानाकोपर्यातून येणार्या जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन पुसेगावमध्ये होत आहे. या प्रदर्शनात देखणी व जातिवंत जनावरे प्रत्यक्ष पाहण्याची पर्वणी खिलारप्रेमींना मिळेल.
– डॉ. सुरेश जाधव, अध्यक्ष, श्री सेवागिरी ट्रस्ट.
हे प्रदर्शन सातारा-पंढरपूर मार्गावरील यात्रा स्थळावर होईल. स्पर्धा फक्त खिलार जनावरांच्या होतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ . सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव हे परिश्रम घेत आहेत.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
जातिवंत खिलार प्रजातींच्या संवर्धनासाठी आयोजन
महाराष्ट्रासह कर्नाटकातील जनावरांचा सहभाग
हजारोंच्या संख्येने खिलारप्रेमींची हजेरी
निवडीवेळी जागेवर निकाल
पाच लाखांहून अधिक रुपयांची बक्षिसे व करंडक





