खादगावच्या दहिफळे बंधूंची अनुकरणीय शेतवाटणी: भाऊबंदकीला सकारात्मक वळण

गंगाखेड (ज्ञानेश्वर फड) : शेतजमिनीच्या वाटणीतून उद्भवणारी भाऊबंदकी आणि कायदेशीर वादविवाद यांना छेद देत खादगाव (ता.गंगाखेड, जि. परभणी) येथील दहिफळे कुटुंबाने आदर्श उदाहरण प्रस्थापित केले आहे. प्रा. डॉ. बाळासाहेब रंगनाथ दहिफळे, प्रा. युवराज रंगनाथ दहिफळे आणि केशव रंगनाथ दहिफळे या तीन भावांनी शेतजमिनीची वाटणी करताना बंधुप्रेम आणि परस्पर विश्वासाचे अनोखे दर्शन घडवले आहे.
दहिफळे कुटुंबातील १६ एकर शेतजमिनीची वाटणी नुकतीच पार पडली. यात प्रा. बाळासाहेब आणि प्रा. युवराज या दोन प्राध्यापक भावांनी प्रत्येकी ३.५ एकर जमीन स्वीकारली, तर शेती करणारे भाऊ केशव यांना ९.५ एकर जमीन देण्यात आली. विशेष म्हणजे, गावातील घर आणि भूखंडही केशव यांच्याकडेच ठेवण्यात आले. याशिवाय, केशव यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारीही दोन्ही प्राध्यापक भावांनी स्वीकारली आहे. ही वाटणी वडील रंगनाथ दहिफळे (वय ८५-९०) यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली झाली, ज्यांनी आपल्या संस्कारांनी मुलांमध्ये बंधुप्रेम रुजवले.
प्रा. बाळासाहेब आणि प्रा. युवराज हे उदगीर येथे स्थायिक असून, त्यांनी स्वतःची घरे बांधली आहेत. दुसरीकडे, केशव गावात राहून शेती करतात आणि त्यांचा मुलगा उदगीर येथे दोन्ही भावांकडे शिक्षण घेत आहे. या वाटणीत दोन्ही भावांच्या पत्नी, अलका बाळासाहेब दहिफळे आणि अश्विनी युवराज दहिफळे यांचाही मोलाचा सहभाग आहे.
ही वाटणी केवळ जमिनीचीच नव्हे, तर सामाजिक एकतेचे आणि कौटुंबिक बंधांचे उदाहरण आहे. शेतकरी भावाच्या योगदानाची जाण ठेवत, शिक्षित भावांनी त्याला जास्त हिस्सा देऊन सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला. या अनुकरणीय कृतीचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश फड यांनी कौतुक केले असून, समाजाने यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.





