खळबळजनक ! पाकिस्तानातील धर्मगुरूची हत्या

कराची – पाकिस्तानातील प्रभावशाली सुन्नी मुस्लिम धर्मगुरूची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. कराची जामिया फारुकीया शिक्षण संस्थेचे पमुख डॉ. आदिल खान यांच्यावर काल सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला.
कराची शहरामध्ये झालेल्या या घटनेत मौलाना डॉ. आदिल खान यांच्यासह त्यांच्या चालकाचाही मृत्यू झाला, असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.
फैजल कोलोनीतील कराची जामिया फारुकीया शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या मौलान सलीमुल्लाह खान यांचे डॉ. खान हे पुत्र होते. या शिक्षण संस्थेमध्ये देवबंदी पंथाची सुन्नी शिक्षण दिले जाते.
डॉ. खान जात असलेली कार फैजल कॉलोनीजवळच्या शॉपिंग सेंटरजवळ थांबल्यावर सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर बेछुट गोळीबार केला आणि पळून गेले. जखमी झालेल्या डॉ. खान यांना लियाकत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
पाकिस्तानमध्ये वांशिक तणाव निर्माण करण्यासाठीचे कारस्थान म्हणून ही हत्या करण्यात आल्याचे दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख राजा उमर खिताब यांनी सांगितले.





