Excise Raid Pune: दौंड-इंदापुरातील बनावट मद्य रॅकेटचा पर्दाफाश! ४ आरोपी ताब्यात, लाखांचा लाखांचा मुद्देमाल जप्त
Excise Raid Pune: राज्य उत्पादन शुल्क विभागाची दौंड आणि इंदापूर परिसरात धडक कारवाई; बनावट देशी-विदेशी दारूची वाहतूक व उत्पादन करणारी टोळी गजाआड.

Excise Raid Pune – राज्य उत्पादन शुल्क विभागाने दौंड व इंदापूर परिसरात बनावट मद्याविरोधात मोठी कारवाई करत बनावट देशी व विदेशी मद्याची वाहतूक, साठवणूक आणि उत्पादन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण ४ लाख ८१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बोरिबेल गावाच्या हद्दीत रेल्वे बोगद्याजवळ, दौंड–रावणगाव रस्त्यावर सापळा रचून मारुती सुझुकी अल्टो एलएक्स वाहनाची तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये टँगो पंच या देशी मद्याच्या ३,१०० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी अभिजीत शिवाजी नायकुडे व नागेश संजय चव्हाण यांना अटक करून वाहनासह १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासात रेडणी (ता. इंदापूर) येथे छापा टाकून टँगो पंचच्या १,९०० बाटल्या, रॉयल स्टॅग, इम्पिरियल ब्ल्यू व मॅकडॉवेल्स नंबर १ व्हिस्कीच्या प्रत्येकी ४८ बाटल्या जप्त केल्या.
या कारवाईत अजय संभाजी चव्हाण व राजेश संभाजी चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अभिजीत नायकुडेच्या घरातून बनावट लेबल असलेल्या रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज व इम्पिरियल ब्ल्यूच्या ४०९ बाटल्या जप्त केल्या. कारवाईत प्रविण सोनवणे, मयुर गाडे, प्रदीप झुंजरुक, दिनेश ठाकूर, रामलिंग भांगे, सुहास पोळ व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक करत आहेत.





