दुसऱ्यावर अंवलुबून राहण्यापेक्षा स्वत: तपास करा

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण : हायकोर्टाने उपटले एसआयटीचे कान
मुंबई: कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी सीबीआय आणि कर्नाटक पोलिसांनी कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या तपासावर अवलंबुन राहणाऱ्या एसआयटीचे उच्च न्यायालयाने आज चांगलेच कान उपटले.

या तपास यंत्रणांनी तपास करून अटक केलेल्या आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेऊन काय करता. इतरांनी केलेल्या तपासावर अवलंबून राहू नका, तर स्वतः करत असलेल्या तपासात काही तरी ठोस प्रगती दाखवा, अशी तंबी दिली. तसेच कोल्हापूर, सांगलीत उद्‌भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे तपासात अडथळा निर्माण झाल्याने सीबीआयला आरोपीने खाडीत टाकलेले हत्यार शोधून काढण्यासाठी चार आठवड्याची मुदत दिली.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी सीबीयाच्या वतीने अतिरिक्त सॅलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोल्हापूर आणि सांगलीत उद्‌भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे तपासात अडथळा निर्माण झाला. गेल्या दीड महिन्यात अधिकाऱ्यांना कामही करता आले नाही. त्यामुळे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येकरीता वापरण्यात आलेले आणि खाडीत फेकलेले हत्यार शोधण्यासाठी अजून किमान चार आठवड्याचा कालावधी आवश्‍यक असल्याचे न्यायालयाला सांगितले.

तर एसआयटीने डॉ. दाभोलकर आणि कलबुर्गी हत्या प्रकरणातील आरोपींना ताबा घेतला असून याचा तपास सुरू असल्याचे सांगताच न्यायालयाने तिव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. इतरांनी केलेल्या तपासावर अवलंबून राहू नका. तर स्वतः करत असलेल्या तपासात काही तरी ठोस प्रगती दाखवा, अशा शब्दांत कान उपटत याचिकेची सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×