आर्थिक फसवणूक प्रकरणी माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अजूनही फरार

निमोणे – करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत एका माजी सैनिकाची पत्नी कंपनीत भागीदार आहे. बनावट कागदपत्रे बनवून त्यांचा राजीनामा घेत त्यांना कंपनीच्या भागीदारीतून काढून टाकण्यात आले. याप्रकरणी रेश्मा राहुल वाळके (वय ३७ रा. करडे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत गुरुवार (दि ३०) रोजी शिरुर तालुक्यातील माजी सैनिकांनी शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेत या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना तातडीने अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बोगस कागदपत्रे बनवत घेतला राजीनामा –
करडे येथील माजी सैनिक राहुल वाळके यांच्या पत्नी रेश्मा वाळके या डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या २ सप्टेंबर २०२४ ते आजपर्यंत संचालक व भागीदार असताना कंपनीचे दुसरे संचालक व भागीदार संभाजी वाळके आणि सचिन वाळके यांनी रेश्मा वाळके यांना कंपनीच्या कोणत्याही मिटिंगमध्ये न बोलावता तसेच कोणतीही कायदेशीर नोटीसची बजावणी न करता प्रियांका वाळके यांची संचालक म्हणुन नियुक्ती केली आणि त्यानंतर लगेचच वाळके यांना कंपनीच्या संचालक पदावरुन बेकायदेशीररीत्या बरखास्त करण्यात आले.
पोलिस अधिक्षकांना करावा लागला हस्तक्षेप –
माजी सैनिक राहुल वाळके आणि त्यांच्या पत्नी रेश्मा वाळके यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेतली. परंतु शिरुर पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांनी थेट पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांची भेट आपली व्यथा त्यांना सांगितली. त्यानंतर पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर शिरुर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असल्याचे माजी सैनिक राहुल वाळके यांनी “दै.प्रभात” शी बोलताना सांगितले.
मोकाट फिरणाऱ्या आरोपीना अटक कधी होणार ?
करडे येथील माजी सैनिक आणि त्यांच्या पत्नीची आर्थिक फसवणूक केल्यानंतर गुन्हा दाखल होऊनही चारही आरोपी अजुनही मोकाट फिरत आहेत. देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी जे सैनिक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देतात. त्यांच्यावर अन्याय झाल्यावर गुन्हा दाखल होऊनही पोलिसही जर बघ्याची भुमिका घेत असतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा…? असा सवाल उपस्थित करत शिरुर तालुक्यातील माजी सैनिकांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच याबाबत शिरुरचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देत लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
“करडे येथील माजी सैनिक यांच्या पत्नीच्या आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झाला असून विविध कलमांच्या आधारे ज्या ज्या तरतूदी आहेत. त्या तरतूदींच्या आधारे वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच या घटनेतील पुराव्यांच्या आधारे आम्ही पुढील तपास करत आहोत.” – संदेश केंजळे (पोलिस निरीक्षक, शिरुर)





