Thaksin Shinawatra : थायलंडचे माजी पंतप्रधान 15 वर्षांनी परतले मायदेशी

बॅंकॉक :- थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा हे 15 वर्षांनंतर मायदेशी परतले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचारासह इतर काही आरोप असल्यामुळे 15 वर्षांपूर्वी ते परदेशात निघून गेले होते. त्यानंतर मायदेशी परत येण्याचा त्यांनी तब्बल 20 वेळा प्रयत्न केला होता. मात्र दर वेळी त्यांना अटक केली जाण्याची भीती असल्याने त्यांना आपला बेत रद्द करावा लागला होता.
बॅंकॉकवरच्या डॉन मुएंग विमानतळावर खासगी विमानाने आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. विमानतळावरूनच त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावरील प्रलंबित प्रकरणांच्या उर्वरित प्रक्रियेबाबत निश्चिती केली गेली.
थायलंडच्या संसदेमध्ये नवीन पंतप्रधानांच्या निवडीसाठी मतदान घेतले जाणार आहे. त्याच्या काही तास आगोदर शिनावात्रा थायलंडमध्ये परतले आहेत. त्यांना सुनावलेल्या 12 वर्षांच्या शिक्षेची अंमलबजावणी होणे अजून बाकी आहे.
शिनावात्रा यांच्याप्रमाणेच त्यांच्या भगिनी यिन्ग्लुक शिनावात्रा यांनाही 5 वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती. त्यानंतर त्याही देशाबाहेर पळून गेल्या आहेत. 2014 मध्ये लष्कराने उठाव केल्यावर त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा…
थाकसिन शिनावात्रा 2008 मध्ये थायलंडमधून पळून गेले. त्यांच्या तत्कालिन पत्नी खुन्यिंग पोत्जामान ना पोम्बेज्रा यांना मोक्याच्या ठिकाणचा एक भूखंड सवलतीच्या दराने खरेदी करण्यासाठी पंतप्रधान असताना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. थायलंडच्या कायद्यानुसार शिनावात्रा यांना या आणि एन्य दोन प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या तिन्ही प्रकरणात त्यांना त्यांच्या अनुपस्थितीतच दोषी ठरवले गेले आहे. मात्र शिनावात्रा हे 70 पेक्षा जास्त वयाचे असल्याने ते राजघराण्याकडून शिक्षेत सवलतीची मागणी करू शकतात.





