100 कोटी खंडणी प्रकरण : अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार? न्यायालयीन कोठडी संपली

मुंबई – 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत असून आज त्यांची न्यायालयीन कोठडी समाप्त होणार आहे. देशमुख यांना न्यायालयकडून दिलासा मिळणार की त्यांना तुरुंगातच रहावे लागणार हे पहावे लागणार आहे. देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे.
नुकताच चांदीवाल आयोगाने अनिल देशमुख यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. एएनआयच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलीसमधील बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाजे यांची उलटतपासणी करण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील उपस्थित नसल्याने चांदीवाल आयोगाने हा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या वर्षी मार्चमध्ये, महाराष्ट्र सरकारने तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया बाहेर स्फोटके सापडल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 100 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि अंमलबजावणी संचालनालय या आरोपांची चौकशी करत आहेत.





