लोकसभा निवडणुकीत पराभव, आता मोठी जबाबदारी; केरळमध्ये ‘हा’ नेता सांभाळणार भाजपची धुरा

थिरूवनंतपूरम – माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर केरळमध्ये भाजपची धुरा सांभाळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाईल. त्याविषयीची औपचारिक घोषणा उद्या (24 मार्च) होण्याची शक्यता आहे.
भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के.सुरेंद्रन यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्या पदाचे उमेदवार म्हणून चंद्रशेखर यांनी रविवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली जाईल.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे निकटवर्तीय म्हणून ६० वर्षीय चंद्रशेखर यांना ओळखले जाते. त्यांनी याआधी तीन कार्यकाळासाठी राज्यसभा खासदार म्हणून कार्य केले. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.
मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत चर्चेतील उमेदवारांमध्ये त्यांचा समावेश होता. ती निवडणूक त्यांनी थिरूवनंतपूरम मतदारसंघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या विरोधात लढवली. मात्र, थरूर यांच्या विरोधात त्यांच्या पदरी अपयश पडले. आता पक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळण्यास ते सज्ज होणार आहेत.





