खळबळजनक…! भाजपच्या माजी नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न; वाल्मीक कराडचं नाव घेत म्हणाले…

Bharat Jadhav : नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा विष पिऊन स्वत:चा जीव संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष प्यायलं होतं. फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक असलेले भरत जाधव हे मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात होते. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगत जाधव यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर ते कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथं जाऊन भरत जाधव यांनी विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. हा प्रकार लक्षात येताच जाधव यांना तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ते म्हणाले, प्रचंड मानसिक तणावातून हे पाऊल उचलत आहे. समाजात वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे काम करू शकत नाही. 25 वर्षांच्या राजकारणात मी कधीच अप्रामाणिकपणा केला नाही. मात्र आता मला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
अनेक प्रकल्प केवळ राजकीय दबाव वापरून थांबवण्यात आल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी जामखेड तालुक्यात इमारतीचं काम सुरू केलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत रमेश आसबे, युनूस सैय्यद, बेबीचंद धनावडे होते. मात्र राजकीय दहशतीतून इथलं काम बंद पाडण्यात आल्याचं भरत जाधव यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं.
नीलेश घायवाल आणि सचिन घायवाल यांच्या दोन-तीन गाड्या ३०-४० फूट अंतरावर घटनास्थळी गेल्या. या इमारतीसाठी एकही बुकिंग नाही. आज सुमारे तीन ते चार कोटी उद्योजक बँक कर्जामुळे तोटा सहन करत आहेत. मला ते सहन होत नाहीये, अशा गोष्टी घडत आहेत. बँकेचे कर्ज आणि व्याज सुरू झाले आहे.
जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. मुन्नाभाई आणि संदीप एकाच व्यवसायात आले आणि त्यांना भागीदार म्हणून घेतले. त्यांनी बारा महिन्यांत ९० लाख रुपये कमावले आणि ६० लाख रुपयांचा नफा कमावला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली, असा आरोप जाधव यांनी केला आहे.





