Ghatkoper Ashok Nagar Landslide : ‘क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झालं’; घाटकोपर दुर्घटनेतील बचावलेल्या व्यक्तीने सांगितला थरार
Ghatkoper Ashok Nagar Landslide : मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेतून सुखरुप बचावलेल्या एका व्यक्तीने घटनेचा थरार सांगितला.

Ghatkoper Ashok Nagar Landslide : मुंबईत सध्या पावसाची संततधार कायम आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागातील जनजीवनावर त्याचा परिमाण होताना दिसत आहे. आज पहाटेच्या सुमारास एक दुर्देवी घटना घडली. पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांच्या सुमारास मुंबईतील घाटकोपर भागातील अशोक नगरमधील ‘गौसिया चाळी’तील दोन ते तीन घरांवर दरडीचा ढिगारा कोसळला.
या दुर्घेटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांना बाहेर काढण्याचे शर्यतीचे प्रयत्न बचाव पथकाडून केले जात आहेत. मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेतून सुखरुप बचावलेल्या एका व्यक्तीने घटनेचा थरार सांगितला.
एका न्यूज चॅनेलला दिलेल्या बॅाईटमध्ये या दुर्घटनेत बचावलेल्या व्यक्तीला मध्यरात्री अचानक जाग आली. तो लघूशंकेसाठी गेला आणि त्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली. तो म्हणाला, “मी रात्री तीन वाजता लघूशंकेसाठी उठलो होता. त्यानंतर मी झोपेसाठी विचार करत होतो आणि तेवढ्यात एकदम हे घडलं. डोंगराच्या ढिगाऱ्याखाली शेजारी असलेली मुलं दबले गेले होते. मी देखील अडकून पडलो होतो. भिंत तुटली होती, त्यामधून मी, माजी बायको आणि दोन मुलं बाहरे पडलो. त्यानंतर आम्ही पळत पळत दुसऱ्या गल्लीमधून बाहेर आलो.”
पुढे ती व्यक्ती म्हणाली, आमचा जन्म येथेचं झाला असून बालपण येथेच गेलं आहे. बीएमसीकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. दोन जण मरण पावले होते आणि दोन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती त्याने दिली. दोन दिवसांपूर्वी येथे राहण्यास आलेलं कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती देखील त्याने दिली. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तीन लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?
ही दुर्घटना घडल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी स्वत: तिथे जाऊन पाहणी केली. “काही जण आत अडकल्याची भिती आहे. अगदी युद्ध पातळीवर फायर ब्रिगेड, मुंबई महापालिकेचे कर्मचारी तिथे काम करतायत. मी स्वत: घटनास्थळी जाऊन आले आहे. अविनाश ढाकणे साहेब तिथे आहेत. इतकी अरुंद गल्ली आहे की, एक-एक दगड हाताने बाजूला करावा लागत आहे. अतिशय वाईट दुर्घटना घडली आहे”





