“अहंकार काय असतो, हे सर्वांना माहिती झालं पाहिजे”; राहुल कनाल यांच्या ट्वीटने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय युवासेना नेते राहुल कनाल शिवसेनेत ( शिंदे गट ) जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राहुल कनाल शनिवारी म्हणजेच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असून राहुल कनाल यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे राजकीय चर्चां रंगत आहेत.
वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. यावरून राहुल कनाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत राहुल कनाल म्हणाले, “दु:ख होतंय! हे कोणी केलंय, सर्वांना चांगलं माहिती आहे. पण, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं, त्यांचं न ऐकता काढून टाकणं, हा अहंकार आहे.” असे म्हटले आहे.
Feeling Sad !!! Very well know who has done this but removing people who have worked for you without a hearing is arrogance and you could remove me but not the people who have worked day and night yet Chalo acha hai sabko pata chale ke Ego Aur arrogance kya hota hai !!! pic.twitter.com/JFlB9uZjUU
— Rrahul Narain Kanal (@Iamrahulkanal) June 30, 2023
तसेच “तुम्ही मला हटवू शकता. मात्र, ज्यांनी रात्रंदिवस काम केलं, त्यांना हटवू शकत नाही. अहंकार काय असतो, हे सर्वांना माहिती झालं पाहिजे,” असे राहुल कनाल यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या ट्वीटमध्ये राहुल कनाल यांनी, “जय महाराष्ट्र!!! ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्या कार्यकर्त्यांना माझ्यामुळे सामना करावा लागत आहे. यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही त्याची सुरुवात केली आहे. धन्यवाद,” असे म्हटले आहे.





