प्रत्येक शांतता प्रयत्नानंतर पाकिस्तानकडून विश्वासघात : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, प्रत्येक शांतता प्रयत्नानंतर विश्वासघाताला आणि शत्रुत्वाच्या कृतींना सामोरे जावे लागले, असे परखड भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अमेरिकी संगणक तज्ञ आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्याशी मोदींनी ३ तासांचा प्रदीर्घ संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. शांततेच्या उदात्त हेतूने पाकिस्तानपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान म्हणून मी सर्वप्रथम २०१४ यावर्षी शपथ घेतली. भारत आणि पाकिस्तानमध्ये नवा अध्याय सुरू व्हावा अशी माझी इच्छा होती. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला मी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना विशेष निमंत्रण दिले, याचीही आठवण मोदींनी करून दिली. पाकिस्तानी जनतेलाही शांतता हवीय. ती जनताही दहशत, संघर्ष आणि अशांतता या सततच्या स्थितीला कंटाळली असेल. पाकिस्तानला एक दिवस सुबुद्धी सुचेल. तो देश शांततेचा मार्ग अवलंबेल अशी आशा वाटते, असे ते म्हणाले.
ट्रम्प आणि माझ्यात परस्पर विश्वास
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींनी प्रशंसा केली. आमच्यात परस्पर विश्वासाचे संबंध आहेत. आमच्यासाठी आपापल्या देशांचे हित सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे आमचे संबंध चांगल्या प्रकारे जुळले आहेत. ट्रम्प धैर्यवान आहेत. स्वत:हून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. अधिक तयारी करून ते दुसऱ्या कार्यकाळासाठी सज्ज झाल्याचे दिसतात. अमेरिका फर्स्ट हे ट्रम्प यांचे धोरण आहे. माझाही राष्ट्र प्रथम या भूमिकेवर विश्वास आहे, असे मोदींनी नमूद केले.





