करोना संसर्ग असताना रेल्वे प्रवास केल्यास तुरूंगवास !

नवी दिल्ली – रेल्वे प्रवाशांना करोना संसर्ग असतानाही प्रवास करणे किंवा करोना फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन न करणे महागात पडणार आहे. संबंधित प्रवाशांना दंड ठोठावला जाऊ शकतो. प्रसंगी तुरूंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.
रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे प्रवाशांसाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचनांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. रेल्वे प्रवाशांना मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.
करोना संसर्ग असल्यास किंवा करोना चाचणीचा अहवाल मिळणे बाकी असल्यास संबंधिताला रेल्वे प्रवास करता येणार नाही. संबंधिताला रेल्वे स्थानकावरही जाण्याची मनाई करण्यात आली आहे. रेल्वे परिसरात थुंकण्यावर आणि कचरा फेकण्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
सूचनांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्या कलमांतर्गत किमान 250 रूपये दंड आणि 1 महिना ते 5 वर्षे तुरूंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.





