Pratibha Dhanorkar : “मला व्हिलन ठरवण्यात आले असले तरी, वेळ आल्यावर…”; काँग्रेस खासदारांचं मोठं वक्तव्य, कुणाला दिला इशारा?
Pratibha Dhanorkar : चंद्रपूर महापालिकेत मोठ्या घडामोडीनंतर भाजपचा महापौर विराजमान झाला. यानंतर एका कार्यक्रमात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Pratibha Dhanorkar : चंद्रपूर महानगरपालिकेत मोठ्या राजकीय घडामोड्या घडल्या आणि ऐनवेळी भाजपचा महापौर विराजमान झाला. ही राजकीय उलथापालथ होण्याचे कारण काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष असल्याचे सांगितले जाते. धानोरकर आणि वड्डेटीवार यांच्यातील अंतर्गत वादाचा फायदा भाजपने घेतला असल्याची चर्चा आहे. चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेसच्या हातून गेल्यानंतर जोरदार टीका करण्यात आली. अशातच काँग्रेस खासदार प्रतिभा धानोलकर यांनी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केले आहे.
“राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने पक्षावर विश्वास टाकला. सत्ता स्थापन करताना काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात व्हिलन ठरवण्यात आले असले, तरी वेळ आल्यावर मी माझी आपबीती जनतेसमोर नक्कीच मांडणार.” असे मोठं वक्तव्य खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. चंद्रपूर येथे आयोजित काँग्रेस व मित्र पक्षाच्या नवनिर्वाचित तसेच पराभूत उमेदवारांचा स्नेहमिलन सोहळ्यात धानोरकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
व्यासपीठावर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कुंदा जेनेकर, शहराध्यक्ष संतोष लहामगे, विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, नगरसेवक वसंता देशमुख यांच्यासह बहुसंख्येने नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावे, अशा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या. पक्ष वाढविण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. मात्र काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात.” असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.





