पुणे – एकीकडे खासगी किंवा सरकारी नोकरी करायची. तिथल्या सुटीनंतर रिक्षा चालवायची. अशी डबल ड्युटी करणाऱ्यांचे परमिट धोक्यात आले आहे. नोकरी करत असताना ही रिक्षा परवाना असणाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत हे परमिट परत करावे लागणार आहे. याबाबत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई सुरू केली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला मोटार व्हेईकल ऍक्टनुसार हे परवाने दिले जातात. लोकसंख्या वाढल्यामुळे त्या प्रमाणत रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओकडून नवीन रिक्षांना परवाने देण्यास २०१७ मध्ये सुरूवात करण्यात आली होती. २०१७ पर्यंत पुणे शहरात ४६ हजार ०४ रिक्षांना परवाने देण्यात आले होते. त्यानंतर अनेकांना व्यवसाय मिळाला. अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली. शहरात सध्या ८३ हजारांपेक्षा जास्त रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. तर, पिंपरी चिचंवड परिसरात देखील ४० हजार रिक्षा परवाने दिले आहेत. कायद्यानुसार रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, किंवा इतर कोणत्याही खासगी संस्थेत नोकरी करत नसल्याची अट आहे. संबंधित व्यक्तीकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात येते. तरीही शहरात काही जण नोकरी करून शिल्लक वेळेत रिक्षा चालवित असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. “रिक्षा परवाना घेताना तो कोठेही नोकरी करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले असते. परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्या व्यक्तीने रिक्षा परवाना परत करणे आवश्यक आहे. नोकरी करत असेलेले आणि रिक्षा परवाना असलेल्यांनी तो ३१ जानेवारीपर्यंत परत करावा.” – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.