नवी दिल्ली – कॉंग्रेसने तेलंगणात भाजपच्या वाहनाचे सर्व टायर पंक्चर केले. आता आम्ही दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या वाहनाचे चारही टायर पंक्चर करणार आहोत, असा मार्मिक इशारा कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी शनिवारी दिला.तेलंगणात विविध सभांच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडवून देताना राहुल यांनी भाजप आणि त्या राज्यातील सत्तारूढ भारत राष्ट्र समितीवर (बीआरएस) टीकेची झोड उठवली. (Congress vs bjp) भाजप आणि बीआरएसमध्ये (BRS) छुपा समझोता झाला आहे. त्यांच्यात हातमिळवणी आहे. गरजेच्या वेळी ते एकमेकांना मदत करतात. आता तेलंगणात बीआरएसचा पराभव करण्याची गरज आहे. त्यानंतर दिल्लीत (केंद्रात) मोदींचा पराभव करावा लागेल, असे ते म्हणाले. (Modi sarkar) तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर राहुल यांनी उपरोधिक शैलीत निशाणा साधला. कॉंग्रेसने काय केले असा प्रश्न केसीआर विचारत असतात. त्यांचे शिक्षण झालेल्या शाळा, विद्यापीठाची उभारणी कॉंग्रेसने केल्याचे मी त्यांना सांगू इच्छितो. केसीआर यांचे विमान जिथून उड्डाण करते; ते विमानतळ कॉंग्रेसने बांधले. हैदराबादचे रूपांतर जगातील महत्वाच्या माहिती-तंत्रज्ञान केंद्रात कॉंग्रेसनेच केले. इतकेच काय पण तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे श्रेयही कॉंग्रेसकडे जाते, असे त्यांनी नमूद केले. राहुल यांनी त्यांच्या भाषणातून कॉंग्रेस आणि बीआरएसमध्येच तेलंगणात मुख्य लढत होणार असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न केला. तेलंगणातील सत्तास्पर्धेत भाजप कुठेच नसल्याची भूमिका त्यांनी अप्रत्यक्षपणे भाषणातून मांडली.