The Odyssey: ४ हजारांचं तिकीट काढूनही ‘द ओडिसी’चा खरा अनुभव मिळणार नाही! भारतातील चाहत्यांसाठी मोठी निराशाजनक बातमी
The Odyssey सध्या भारतातील बहुतांश IMAX थिएटरमध्ये डिजिटल किंवा लेझर प्रोजेक्शन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही प्रणाली सामान्य स्क्रीनपेक्षा निश्चितच अधिक चांगली असली, तरी ती 70MM IMAXच्या दर्जाशी तुलना करू शकत नाही. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना चित्रपटाची कथा, अभिनय आणि दृश्यांचा आनंद मिळेल, पण नोलन यांनी ज्या भव्य स्वरूपात हा चित्रपट तयार केला आहे, तो पूर्णपणे अनुभवता येणार नाही.

The Odyssey: हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या आगामी ‘द ओडिसी’ या चित्रपटाची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. भारतातील सिनेरसिकही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. अनेक जण सर्वोत्तम अनुभवासाठी महागडी आयमॅक्स (IMAX) तिकिटे बुक करण्याची तयारी करत आहेत. मात्र, ३ ते ४ हजार रुपये खर्च करूनही भारतीय प्रेक्षकांना या चित्रपटाचा नोलन यांनी अपेक्षित केलेला खरा सिनेमॅटिक अनुभव मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
यामागचे मुख्य कारण म्हणजे भारतात खऱ्या 70MM IMAX प्रोजेक्शनची सुविधा नसणे. ख्रिस्तोफर नोलन यांनी ‘द ओडिसी’ हा चित्रपट अत्याधुनिक 70MM IMAX कॅमेऱ्यांवर चित्रित केला आहे. या तंत्रज्ञानामुळे चित्रपट अधिक मोठ्या फ्रेममध्ये, अधिक स्पष्ट आणि वास्तवदर्शी दिसतो. मात्र, हा अनुभव घेण्यासाठी विशेष प्रकारचा 70MM IMAX प्रोजेक्टर आणि विशाल स्क्रीन आवश्यक असते.
सध्या भारतातील बहुतांश IMAX थिएटरमध्ये डिजिटल किंवा लेझर प्रोजेक्शन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही प्रणाली सामान्य स्क्रीनपेक्षा निश्चितच अधिक चांगली असली, तरी ती 70MM IMAXच्या दर्जाशी तुलना करू शकत नाही. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना चित्रपटाची कथा, अभिनय आणि दृश्यांचा आनंद मिळेल, पण नोलन यांनी ज्या भव्य स्वरूपात हा चित्रपट तयार केला आहे, तो पूर्णपणे अनुभवता येणार नाही.
मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये IMAX थिएटर्स आहेत. मात्र, त्यापैकी एकाही व्यावसायिक थिएटरमध्ये मूळ 70MM IMAX प्रोजेक्शनची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक सिनेरसिक महागडे तिकीट काढूनही चित्रपटाचा संपूर्ण तांत्रिक अनुभव घेऊ शकणार नाहीत.

THE ODYSSEY – Christopher Nolan
चित्रपट क्षेत्रात काही जण भारतातील या डिजिटल IMAX स्क्रीनला विनोदाने ‘LIEMAX’ असेही संबोधतात. कारण त्या IMAX नावाने चालत असल्या तरी, त्या मूळ 70MM IMAX अनुभव देत नाहीत. काही वर्षांपूर्वी गुजरातमधील सायन्स सिटीमध्ये 70MM IMAX प्रोजेक्टर उपलब्ध होता. मात्र, कालांतराने तेथील व्यवस्था बदलली आणि आता भारतात अशी सुविधा जवळपास अस्तित्वात नाही.
ख्रिस्तोफर नोलन हे नेहमीच पारंपरिक फिल्म रीलवर चित्रपट चित्रीत करण्याला प्राधान्य देतात. त्यांच्या मते, 70MM फिल्म रीलमधील खोली, रंगांची गुणवत्ता आणि दृश्यांचा विस्तार डिजिटल तंत्रज्ञानात पूर्णपणे मिळू शकत नाही. त्यामुळे ते आजही शक्य तिथे फिल्म रीलचाच वापर करतात.
‘द ओडिसी’च्या माध्यमातून नोलन यांनी पुन्हा एकदा 70MM IMAX तंत्रज्ञानाचा वापर करत प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जगातील मोजक्याच देशांमध्ये या तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारी थिएटर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतातील प्रेक्षकांना या चित्रपटाचा मूळ अनुभव घेण्यासाठी परदेशातील काही निवडक थिएटरमध्ये जावे लागू शकते.
भारतात या चित्रपटाचा प्रतिसाद मोठा असण्याची शक्यता आहे. विशेषतः नोलन यांच्या चित्रपटांचे चाहते मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, तांत्रिक मर्यादांमुळे त्यांना दिग्दर्शकाने कल्पना केलेला शंभर टक्के अनुभव मिळणार नाही. त्यामुळे ४ हजार रुपयांचे तिकीट घेतले तरी चित्रपटाचा खरा 70MM IMAX अनुभव भारतात सध्या तरी मिळणार नसल्याने अनेक चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.





