Pune Metro : गणपती बाप्पाच्या आगमनाला अगदी काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात गणेशउत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव काळात जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून भाविक पुण्यात गणेशउत्सवाच्या निमित्ताने देखावे पाहण्यासाठी येतात. यामुळे पुण्यात मोठी गर्दी दरवर्षी होत असते. यामुळेच भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या सोईसाठी पुणे मेट्रोने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भाविकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. तसेच विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत भाविकांना गणपतींचे देखावे पाहता येणार आहेत. यावर्षी गणेशोत्सवावेळी पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो सुरू असणार आहे. त्यामुळे पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. मेट्रोच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातील मंडई, कसबा या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून त्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे. कशी असणार वेळ? अनंत चतुर्दशीच्या दिवशी दि. 6 सप्टेंबर या दिवशी सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे. तब्बल ४१ तास पुणे मेट्रो या दिवशी प्रवाशांना सेवा देणार आहे. तर दि. 27 ते 29 ऑगस्ट या तीन दिवसांत मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच दि. 30 ऑगस्ट ते दि. 5 सप्टेंबर या काळात मेट्रोसेवा सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत सुरू राहणार आहे. हेही वाचा : धक्कादायक ! पाकिस्तानी महिलांचे बिहारमध्ये बनावट ओळखपत्र ; सुरक्षा यंत्रणांच्या तपासात माहिती उघड