चंदीगढ – पत्नीने जरी पतीची हत्या केली असेल तरी देखील ती फॅमिली पेन्शनसाठी पात्र आहे, असा महत्वपूर्ण निकाल पंजाब-हरयाणा हायकोर्टाने दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीला फॅमिली पेन्शन दिली जाते. मात्र, अंबाला येथील रहिवासी असलेल्या बलजीत कौर यांची फॅमिली पेन्शन रोखण्यासाठी कोर्टात याचिक दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने हा निणर्पय दिला.
बलजीत कौर यांचे पती तरसेम सिंह हरयाणा राज्य सरकारचे कर्मचारी होते. त्यांचा 2008मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर 2009मध्ये त्यांची पत्नी बलजीत कौर यांच्यावर पतीच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, 2011मध्ये बलजीत कौर या प्रकरणात दोषी ठरल्या होत्या. दोषी ठरल्यानंतर हरयाणा सरकारने त्यांना पतीच्या मृत्यूनंतर मिळणारे वित्तीय अधिकार रोखले होते.
यावर हायकोर्टाने हरयाणा सरकारचा आदेश फेटाळत म्हटले की, हा आदेश नियमांविरोधात आहे. जर कर्मचाऱ्याची वागणूक योग्य नसेल. तसेच जर त्याच्यावर गंभीर गुन्ह्यात दंडात्मक कारवाई झालेली असेल तर त्याला शिक्षा म्हणून पेन्शन आणि अन्य लाभ काढून घेतले जाऊ शकतात.
पण जर कर्मचाऱ्याच्या पत्नीची वागणूक योग्य नसेल तसेच तिला जरी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले असेल तरी तिला फॅमिली पेन्शन आणि वित्तीय लाभाचे हक्क मिळतील. दरम्यान, हायकोर्टाने हरयाणा सरकारला दोन महिन्यांत याचिकाकर्त्याला प्रलंबित वित्तीय लाभ तसेच फॅमिली पेन्शन देण्याचे आदेश दिले.