ममतादीदींनी सांगितलं तरी एक तासापेक्षा अधिक वेळ प्रचार करणार नाही : नुसरत जहां

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून आता उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून अनेक दिग्गजांना प्रचारात उतरवले आहे. यामध्ये अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा समावेश आहे. मात्र तृणमूल काँग्रेसमध्ये चित्र वेगळच दिसत आहे.
तृणमूल काँग्रेसने सेलिब्रेटी स्टेटस असलेल्या नुसरत जहां यांना प्रचारात उतरवलं . मात्र त्या प्रचार करण्यासाठी फारशा उत्सुक दिसत नाहीत. नुसरत यांचा एक व्हिडीओ भाजपने शेअर केला आहे. ज्यामध्ये नुसरत जहां एका रॅलीसाठी आल्या आहेत. रॅली सुरू असताना त्या रॅलीच्या गाडीतून मध्येच उतरल्या आहेत.
नुसरत रॅलीच्या गाडीतून खाली उतरल्यनंतर टीएमसीचे कार्यकर्ते त्यांना पुन्हा रोडशोमध्ये सहभागी होण्याची विनंती करत आहेत. तसेच सभेच्या ठिकाणी येण्याची विनंती करतात. त्याला नकार देत नुसरत यांनी कार्यकर्त्यांना फटकारलं. मी एक तासापेक्षा अधिक वेळ प्रचार करू शकत नाही. अगदी मुख्यमंत्री ममता दीदींनी सांगितलं तरी मी हे करू शकणार नाही, असं नुसरत यांनी म्हटलं. त्यांच्या भूमिकेची चर्चा सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू आहे.





