Sanjay Raut : “रागाच्या भरात एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, तरी…”; संजय राऊतांनी सर्वोच्च न्यायालयाची मागितली माफी, नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut : रागाच्या भरात एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, तर आपण एकदा नव्हे, तर दहादा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : पत्रकार निखिल वागळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयासंदर्भात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान सरन्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने याचिका दाखल केली असून, न्यायालयाने राऊत यांना त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.
कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर पत्रकार निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. रागाच्या भरात एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, तर आपण एकदा नव्हे, तर दहादा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही न्यायालयाचा अवमान केलेला नाही. रागाच्या भरात एखादा शब्द चुकीचा निघाला असेल, तरी न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला हेतू कधीच नव्हता, असे ते म्हणाले.
देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे मन अस्वस्थ होत असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, अनेक घडामोडींमुळे त्यांच्यासह देशातील लाखो लोकांमध्ये संतापाची भावना आहे. याच रागातून एखादा शब्द तोंडून निघाला असेल, तर त्याबद्दल आपण माफी मागतो. “एकदा नाही, मी दहादा सुप्रीम कोर्टाची माफी मागतो.”
सरन्यायाधीशांबाबत काय केले होते वक्तव्य?
इंडिया आघाडीच्या रॅलीदरम्यान संजय राऊत यांनी देशातील लोकशाहीची स्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. देशात हुकूमशाही सुरू असल्याचा, तसेच मते आणि निवडणुका चोरल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांना भेटण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याची टीका केली होती.
देश संकटात असताना सर्वोच्च न्यायालयाने जनतेसाठी आपले दरवाजे बंद केले, असा आरोपही त्यांनी केला होता. याशिवाय, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील जवळपास ८० न्यायाधीश लंडनमध्ये भाजप नेत्यांसोबत बॅडमिंटन खेळतात आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्ट्यांना उपस्थित राहतात, असा दावाही त्यांनी आपल्या वक्तव्यात केला होता.
अवमान याचिकेमुळे प्रकरण चर्चेत
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने राऊत यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. आता राऊत यांनी माफी मागितल्याने या प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे लक्ष लागले आहे.






