Imran Khan : पाकिस्तानला लष्करच चालवते हे लहान मुलेही जाणतात; इम्रान खान यांची सरकारवर टीका

लाहोर : पाकिस्तान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर चालवत आहेत हे येथे लहान मुलालाही माहिती आहे,असे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांना मी हे सांगू इच्छितो की लष्कराची विश्वासार्हता नष्ट केली जाते आहे. राजकारणात हस्तक्षेप केला जात नसल्याचा दावा लष्कराकडून केला जात असला, तरी पाकिस्तानचे लष्कर प्रमुखच देश चालवत आहेत,असे इम्रान खान यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ज्या व्यक्तीने कधीही पालिकेची निवडणूक लढवलेली नाही, अशी व्यक्ती आता देशातील क्रिकेटपासून अंतर्गत व्यवहारांपासून परराष्ट्र व्यवहारांपर्यंत सर्व गोष्टींचे नियंत्रण करतो आहे. अशा गृहमंत्री आणि पीसीबी अध्यक्ष असलेल्या मोहसीन नक्वी सारख्या दलालांच्या हाती देश सोपवण्यात आला आहे. असे खान यांनी म्हटले आहे. देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी शरीफ आणि झरदारी यांचे नेतृत्व देशावर लादण्यात आले आहे.
या दोन कुटुंबांनी पाकिस्तानला कसे लुटले आहे, हे गुप्तचर संस्थांनी स्वतः आम्हाला गेल्या ३० वर्षांपासून सांगितले आहे. सरे पॅलेस आणि मायफेअर अपार्टमेंटवरील फायली आम्हाला दाखवल्या गेल्या. एनएबीने १,१०० अब्ज पाकिस्तानी रुपयांची वसूली करणे अपेक्षित आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही ४८० अब्ज रुपयांची वसूली करू शकलो होतो. कारण आम्ही उत्तरदायित्वाबाबत गंभीर होतो, असेही इम्रान खान म्हणाले.
मात्र गेल्या १७ वर्षात केवळ ७०-८० अब्ज रुपयांचीच वसूली केली जाऊ शकली. मात्र एनएबी कायद्यात दुरुस्ती करून या दोन कुटुंबांविरोधातील सर्व प्रकरणे बंद करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्यांना लोकांनी नाकारले, त्यांना सत्ता सोपवून लष्कराने आपली विश्वासार्हता गमावली आहे. या संपूर्ण बनावट व्यवस्थेचे अस्तित्व पीटीआयला चिरडून टाकणे, त्यांच्या लोकांना तुरुंगात ठेवणे आणि निवडणुकीतील घोटाळा लपून ठेवण्यावर अवलंबून आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. एकाधिकारशाहीमुळे रशियाचेही पतन झाले होते. तसेच पतन पाकिस्तानचे होत असल्याचे आपल्याला दिसते आहे, त्यासाठी अमेरिका पुढे सरसावत आहे, असा दावाही खान यांनी केला.





