अडीच महिन्यांनतरही सीईटी सेल सुस्तच; विद्यार्थी चिंतेत

पुणे – अभियांत्रिकी, फार्मसी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेली नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी प्रत्यक्ष प्रवेश अर्ज आणि फेरीचे वेळापत्रक अद्यापही जाहीर झालेले नाही. बारावीचा निकाल लागूनही अडीच महिने उलटले असूनही राज्य सीईटी सेलकडून प्रवेश फेरी सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी चिंता आहे. या सर्व स्थितीवरून यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया एक ते दीड महिने लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, दरवर्षी जुलै महिन्यात अभियांत्रिकी प्रवेशाची तीन फेरीचे प्रवेश पूर्ण होत असतात. ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत सर्व प्रवेशप्रक्रिया संपुष्टात येते. मात्र अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत आहेत. त्यामुळे तातडीने वेळापत्रक जाहीर करून, प्रवेशाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
खासगी विद्यापीठांना झुकते माप?
राज्य सीईटी सेलकडून अभियांत्रिकीस अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमास विलंब होत आहे. त्यावरून सध्या खासगी विद्यापीठांचे सर्व प्रवेश फुल्ल झाल्यानंतरच पारंपरिक विद्यापीठ संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश सुरू केले जाणार असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळातून होत आहे. सीईटीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला, तरीही प्रवेश सुरू न झाल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.
विद्यार्थ्यांचे होणार नुकसान
अद्याप नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर नाही. त्यात या आठवड्यात हे वेळापत्रक जाहीर झाल्यास सर्व प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दीड महिना लागतो. त्यानंतर तीन महिन्यांत पहिली सत्र परीक्षा होते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण पडतो. वेळापत्रक लाबंणीवर पडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
उशीर होण्याचे कारण
एआयसीटीईने जून महिन्यापर्यंत संस्थांकडून संलग्नसाठी प्रस्ताव मागविले. त्यामुळे जून महिन्यापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशाची क्षमता किती आहे, हे स्पष्ट नव्हते. जून महिना संपल्यानंतर प्रवेश क्षमता निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी विलंब होत असल्याची माहिती राज्य सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
दरवर्षी जुलैअखेरपर्यंत सर्व प्रवेश फेऱ्या पूर्ण होतात. त्यानंतर दि. १० ते १२ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते. १ ऑगस्टला महाविद्यालये सुरू होतात. यंदा अजूनही प्रवेश फेरीचे काहीच नियोजन दिसत नाही. त्यामुळे प्रवेश काही दिवस पुढे जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ही सर्व प्रक्रिया वेळेत होणे आवश्यक आहे. – प्रा. समीर भोसले, अधिसभा सदस्य





