दहा वर्षानंतरही प्रकल्प कागदावरच

स्वाइन फ्लूनंतर “डिसिज सर्व्हेलन्स सेंटर’ उभारणीची नुसतीच चर्चा
पुणे – पुणे महापालिकेकडून सुरू करण्यात येणारे डिसिज सर्व्हेलन्स सेंटर (रोग पाळत ठेवणे केंद्र) अद्यापही कागदोपत्रीच असल्याचे दिसते. देशभरात स्वाइन फ्लूचा फैलाव झाल्यानंतर या सेंटरची उभारणी करू, अशी चर्चा रंगली होती. नायडू रुग्णालयात हे सेंटर उघडू असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु, दशकभरानंतरही चर्चेपलीकडे डिसिज सर्व्हेलन्स सेंटरची गाडी सरकलेली नसल्याचे चित्र दिसते.
पुणे जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या तीन लाखांवर गेली असून देशात एवढ्या बाधितांची संख्या असणारा पुणे हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. परिणामी, अशा स्थितीत जर डिसिज सर्व्हेलन्स सेंटर असते तर निश्चितच उपयोग झाला असता, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
दरम्यान, दहा वर्षांपूर्वी हे सेंटर ज्यावेळी सुरू करण्याची चर्चा झाली त्यावेळी त्यासाठी 2 कोटींचे बजेट राखीव ठेवण्याबाबत पालिकेकडून निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकांवर बैठका झाल्या तरीही हे सेंटर सुरू झालेच नाही. पुणे शहरात तब्बल 8 हजार नोंदणीकृत वैद्यकीय आस्थापने असून यामध्ये लहान क्लिनिकचा देखील समावेश आहे.
असा झाला असता उपयोग …
– रुग्णांच्या डेटाच्या माहितीचे जलद हस्तांतरण.
– करोनासह अन्य रोग असणारे रुग्ण नेमक्या कोणत्या ठिकाणी ऍडमिट आहेत, याची चुटकी सरशी माहिती.
– माहितीच्या आधारे रुग्णांवर योग्य व तातडीचे उपचार शक्य.
– व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्स कुठेकुठे उपलब्ध आहेत, याची माहिती.
– पुणे पालिकेकरिता कॉमन डेटा शेअरिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले असते.
बैठका झाल्या, निर्णय नाही…
गेल्या दहा वर्षांत सहा-सात वेळा बैठका झाल्या. परंतु, हे सेंटर सुरू करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालाच नाही, अशी माहिती सल्लागार समितीच्या सदस्याने दिली. एखादा सांसर्गिक रोग येतो त्यावेळी शहरातील ठराविक भागात नेमकी काय स्थिती आहे, रुग्णांची संख्या कुठे अधिक आहे, याबाबतच्या डेटाचे कलेक्शन उपयुक्त ठरते. दोन कोटींचे बजेट या सेंटरकरिता राखीव ठेवण्यात आले होते, ज्याच्यामध्ये आयटी विभागाला पगार आदीचा समावेश होता, अशी माहितीही त्या सदस्याने दिली.





