EU Militaries : इराणने युरोपीय संघाचे सदस्य देशांच्या सैन्याला (EU Militaries) दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघर कालिबाफ यांनी ही घोषणा केली आहे. इराणमधील आंदोलन हिंसक मार्गाने दडपल्याच्या आरोपाखाली युरोपीय संघाने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे. इराणची ही घोषणा केवळ प्रतिकात्मक (EU Militaries) असणार आहे. अमेरिकेने पहिल्यांदा २०१९ मध्ये रिव्होल्युशनरी गार्डला दहशतवादी संघटना घोषित केले होते. त्यानंतर विदेशी सैन्याला दहशतवादी ठरवण्याचा कायदा इराणच्या संसदेने केला आहे. या कायद्यानुसारच युरोपीय संघाच्या सदस्य देशांच्या सैन्याला दहशतवादी ठरवण्यात आले आहे. इराणवरील संभाव्य हल्ल्यासाठी अमेरिकेच्या युद्धनौका मध्यपूर्वेत दाखल झाल्यामुळे तणाव वाढला असतानाच ही घोषणा केली गेली आहे. इराणने आज आणि सोमवारी होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रत्यक्ष फायरिंगचा युद्धसराव आयोजित केला आहे. हा पर्शियन आखाताचा एक अरुंद सागरी मार्ग असून या मार्गाने जगभरातील मालवाहतुकीपैकी एक पंचमांश मालवाहतूक होत असते. रिव्होल्युशनरी गार्ड स्वतःच दहशतवादविरोधी गट आहे. अमेरिकेचे अंधानुकरण करत युरोपने या गटालाच दहशतवादी ठरवले आहे. पण त्यांची ही कृती आत्मघातकी आहे, असे कालिबाफ यांनी सांगितले. रिव्होल्युशनरी गार्डला पाठिंबा देण्यासाठीची घोषणा करण्यासाठी कालिबाफ आणि अन्य अधिकारी आज रिव्होल्युशनरी गार्डच्या गणवेशात उपस्थित होते. रिव्होल्युशनरी गार्डकडून इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवरही नियंत्रण आहे. हे सुरक्षा दल केवळ इराणचे सर्वोच्च नेते आयोत्तुल्ला अली खामेनी यांनाच उत्तरदायी आहे. युरोपीय संघाच्या सैन्याबाबतची घोषणा संसदेत झाल्यानंतर उपस्थित संसद सदस्यांनी अमेरिकाविरोधी घोषणाबाजी केली.