पुणे | राज्यात आदिवासी विद्यापीठाची निर्मिती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आदिवासी लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी राज्यात ‘आदिवासी विद्यापीठ’ स्थापन करण्याची गरज असून, त्या दृष्टीने पावले उचलली आहेत, अशी माहिती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिली.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरुड,
नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलसचिव डॉ. दयाराम सोनावणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. यशोधरा हरीभक्त, प्रा. संदीप मेश्राम, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गीते आदी उपस्थित होते.
या वेळी विद्यापीठातील सर्व शाखांच्या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
राधाकृष्णन म्हणाले, आदिवासी लोक कमीत कमी संसाधनांमध्ये राहून, त्यांचे जीवन व्यतीत करत आहेत. आधुनिक ज्ञान आणि सेवासुविधा मिळण्यासाठी त्यांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणावे लागेल.
आपल्याला केवळ शहरांपुरता विकास करून चालणार नाही, तर विकासाची गंगा ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी पट्ट्यापर्यंत न्यावी लागेल. याद्वारे सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रात आदिवासी विद्यापीठाच्या निर्मितीबाबत चर्चा झाली आहे.
सीओईपीसारख्या विद्यापीठांच्या मदतीने आपण ज्ञान आणि कौशल्याधारित आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू. आपल्या भारतीय विद्यापीठांमधून देखील उच्च दर्जाचे आणि जागतिक स्तरावरील स्पर्धेला तोंड देऊ शकेल, असे शिक्षण दिले जात आहे.
त्यामुळे आगामी काळात न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाबाहेर भारतात शिकायला येण्यासाठी व्हिसा मिळावा म्हणून रांगा लागतील, असेही राधाकृष्णन यांनी सांगितले.
विद्यार्थी लॅपटॉपवर अनेक तास अभ्यास किंवा आपली कामे करतात. मात्र, स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी आणि नवे ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज एक तास पुस्तक वाचावे. त्यासाठी दिवसाचा एक तास राखून ठेवावा. – सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल

