मुंबई – महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवतील अधिकारीची व्सवस्थापकिय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत नुकतीच अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. “आषाढी वारी” म्हणजे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूरपर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा होय. वारीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच, परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. “वारी” ही आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुध्द एकादशी अशा दोन वेळा होते. त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, शेगाव येथून संत गजानन महाराज यांची वारी दरवर्षी निघत असते. तसेच अनेक संतांच्या पालख्या महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या ठिकाणावरुन मार्गस्थ होत असतात. राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या महामंडळामार्फत विविध योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल रू.५० कोटी इतके असेल. महामंडळाचे प्रस्तावित कार्य शेकडो वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून “वारी” करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे. सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास, किर्तनकार व वारकऱ्यांना अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इ. सोयी-सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या महामंडळामार्फत वारकरी, किर्तनकार, तीर्थक्षेत्रांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत कार्य करण्यात येईल.