Esha Deol Bharat Takhtani Divorce: बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून भरत तख्तानी आणि तिच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली असून ईशा व तिचा पती व्यावसायिक भरत तख्तानी ११ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाल्याचे म्हंटले जात आहे. ईशा आणि भरत तख्तानीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसले नव्हते, तर याआधी हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. ईशा देओल आणि पती भरत तख्तानी यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. ईशा आणि भरत यांच्या टीमकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. “आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनात होणारे बदल आणि आमच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या आनंदाचा व हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. आमच्या प्रायव्हसीचा कृपया आदर करा.” असं या निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु ईशाने याबाबत सोशल मीडियावर अद्याप कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. दरम्यान, ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी भरत तख्तानीशी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. दोघांचं लग्न इस्कॉन मंदिरात पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर या अभिनेत्रीने तिच्या पहिल्या अपत्याला म्हणजेच राध्याला जन्म दिला. त्यानंतर २०१९ मध्ये ईशाला दुसरी मुलगी झाली. या जोडप्याला 6 वर्षांची राध्या आणि 4 वर्षांची मिराया अशा दोन मुली आहेत. नुकताच हेमा मालिनींचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी भरत हजर राहिला नव्हता. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू झाल्या.