पुणे | वारीत चोरी करणाऱ्या महिलेचे पलायन

पुणे, – पालखी सोहळ्यात दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीने हडपसर ठाण्यातून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला पाेलीस शिपाई यांना निलंबित करण्यात आले आहे.ताराबाई गणपत खांडेकर, असे निलंबित पाेलीस शिपाईचे नाव आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे दागिने चोरल्याप्रकरणी धुरपता अशोक भोसले (३१, रा. टाकळी, ता. सिल्लोड, जि. नांदेड) हिला २ जुलै रोजी हडपसर पोलिसांनी अटक केली होती.
३ जुलै रोजी भोसलेने पाेलिसांची नजर चुकवून पलायन केले. त्यामुळे कर्तव्यात बेजाबबदारपणा व निष्काळजीपणा केल्याने महिला पाेलीस शिपाई खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय परिमंडळ पाचचे पाेलीस उपायुक्त आर. राजा यांनी घेतला आहे.
धुरपता भाेसले असे पसार झालेल्या आरोपीचे नाव असून, हडपसर भागात संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांची पालखी आल्यानंतर गर्दीमध्ये दागिने चाेरताना रंगेहाथ पकडून आराेपीला हडपसर पाेलीस ठाण्यात आणले होते. तिच्या सुरक्षेची जबाबदारी खांडेकर यांच्याकडे देण्यात आली हाेती. त्यांनी आराेपीस सीसीटीएनएस खाेलीत बसवून त्या दुसरे काम करत हाेत्या.
त्या वेळी महिला आराेपीने नजर चुकवून पळ काढला. ती पसार झाल्याचे लक्षात आल्यावर तिचा सर्वत्र शाेध घेतला, सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे बेजाबदार व बेपर्वा वर्तन केल्याचा ठपका ठेवून, तसेच पाेलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे.





